मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

How to avoid loss in share market in Marathi - शेअर बाजारातील संभाव्य नुकसान कसे टाळावे?


हा लेख मुद्दामच काही निवडक प्रश्नांच्या उत्तरादाखल लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. बऱ्याच ठिकाणी शेअर बाजारावर अशा प्रकारचे प्रश्न वाचण्यात आले आणि ह्या विषयावर लिहिण्याचा मोह झाला. हा छोटा लेख जे लोक शेअर बाजारात अगदीच नव्याने येण्याची योजना करत आहेत त्यांचेसाठी लिहिला आहे. कुशल गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीतून बऱ्याच गोष्टी स्वतःच शिकलेले असतीलच.
Rich  Dad  च्या पुस्तकांच्या साखळी प्रकाशनात कुठेतरी एक वाक्य वाचलेले आठवले. ते असे कि 'चुका करणे हे तुमच्या प्रगतीला पूरक आहे; कारण जर चुका केल्या नाहीत तर तुम्ही आज जेवढे बुद्धिमान आहेत तेवढेच बुद्धिमान ५ वर्षानंतर सुद्धा असाल'.  ह्याचा अर्थ चुका करणारा आणि त्यातून शिकणारा मनुष्य चुका न करणाऱ्या मनुष्यापेक्षा जास्त हुशार गणल्या जाईल असा घेता येईल. ह्याच वाक्याला पूरक म्हणा किंवा विरुद्ध म्हणा; एक अजून वाक्य कुठल्यातरी दुसऱ्या पुस्तकात आहे. ते म्हणजे 'जो  एक चुकी वारंवार करतो तो मूर्ख, जो एकदा चुकी करून शिकतो तो समजदार आणि जो दुसऱ्याच्या चुकीवरून शिकतो तो बुद्धिमान'. ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळपास एकच काढल्या जाऊ शकतो तो म्हणजे शिका आणि शिकत राहा. आपण ज्या पण क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात अगोदरही अनेक लोक आपला प्रवास करून काही गोष्टी शिकलेल्या आहेत. त्यामुळे एक पर्याय आहे कि ह्या लोकांकडून शिकावे; म्हणजे त्यांनी निरीक्षण केलेल्या चुका आपण टाळू शकतो आणि दुसरा पर्याय आहे कि आपण स्वतः परत ती चुकी करून शिकावे. 


गुंतवणूक हा विषय आला कि बरेच जण शेअर बाजार ह्या विषयावर अगदी भरभरून बोलतात. जास्त जोखीम आणि जास्त परतावा ह्या नियमात मी मोडतो असे सुद्धा बरेच जण मनमोकळेपणाने कबुल करतात. पण एखाद्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तो जर का खालच्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात झाली कि मग जास्त जोखीम आणि वजा परतावा हि स्थिती निर्माण होते.  दुसरी गोष्ट अशी कि बरेच नवीन नवीन शिकलेले तरुण आपल्या कुण्या मित्राचे अनुसरण करून शेअर बाजारात पाय टाकतात आणि इकडून तिकडून आलेल्या बातम्यांच्या आधाराने ५-१० शेअर मध्ये पैसे गुंतवून मोकळे होतात. सर्वप्रथम मला हे सांगायला काही संकोच नाही कि ह्यातील अनेक चुका मी पण कधी केल्या आहेत आणि म्हणूनच तर मला त्या चुकांकडून बरेच काही शिकायला मिळाले. काही सर्रास आढळणाऱ्या चुका काय आहेत आणि त्यातून काय शिकावे ह्याबद्दल जुजबी माहिती देण्याचा हा प्रयत्न.

१) दुसऱ्याच्या शिफारशीवरून एखादा शेअर विकत घेणे.
ही एक सर्रास आढळणारी चूक आहे.जर पुढच्याची शिफारस चुकीची निघाली (आणि ही शक्यताच जास्त असते) तर तुमची गुंतवणूक वजा चिन्हांमध्ये जाण्याला कोणी वाचवू शकत नाही. इथे अनेक माध्यमांमधून अशी शिफारस सांगितली जाते आणि त्याचे अनुसरण केले तर चांगला परतावा मिळेल हे सांगितल्या जाते. पण फक्त शिफारशींवर अवलंबून न राहता त्या शेअरचे मूलभूत विश्लेषण केल्यानंतरच त्याला घ्यायचे अथवा काही काळ प्रतीक्षा करायची ह्याचा निर्णय घ्यावा. बाजारात संधी ही फक्त एकदाच येते असे नाही. ह्यामध्ये एक अजून गोष्ट बघता येते। शिफारस केलेल्या शेअर ची book  value , त्या शेअरची ५२ आठवड्याची कमी आणि जास्त किंमत ,आणि शेअरने मागील वर्षात किती रुपयांची कमाई दिली आहे (EPS ) वगैरे पाहता येईल.  बरेच कुशल गुंतवणूकदार नियमित लाभांश देणारे शेअर निवडतात जेणेकरून जरी कोण्या कारणाने किंमत कमी झाली तरी लाभांश येण्याची शक्यता राहतेच. जर आपण शेअरचा चार्ट बघणे थोडे फार शिकलो तर तो शेअर कधी घ्यावा ह्याची थोड्या अंशी तरी कल्पना येते.  शिफारस असलेला शेअर जर मार्केट कॅप च्या आधारावर  पहिल्या ५०-१०० कंपनीचा असेल तर खूप जास्त नुकसान होण्याची शक्यता नसते. ह्याउलट जर कोणताही शेअर कधीही घेतला तर त्याची किंमत अगदी आपल्या गुंतवलेल्या किमतीपेक्षा अर्धी व्हायची उदाहरणे सुद्धा आहेत. त्यामुळे नवशिक्यांनी अगोदर इंडेक्स च्या काही मोजक्या शेअर मध्ये अनुभव घेणे रास्त ठरेल.

२) सगळी जमा एखाद्या विशिष्ट शेअर मध्ये गुंतवणे.
कधी कधी एखाद्या शेअर बद्दल एवढा प्रचार होतो कि त्यामध्ये गुंतवणूक न करणे म्हणजे चांगल्या फायद्याला वंचित होणे असे समजल्या जाते. पण इथे त्या शेअरची योग्य किंमत किती आणि आपण तो किती किमतीला विकत घेत आहोत ह्याकडे साधारण गुंतवणूकदार दुर्लक्ष करतो. मग एकदा अशा खरेदीचा जोर ओसरला कि हे शेअर आपल्या रास्त भावाकडे (म्हणजेच खालच्या दिशेने) यायला सुरुवात होते. Behavioral Finance चे अध्ययन केले तर ह्या गोष्टीस दुजोरा मिळू शकतो.  ज्या शेअर चा रास्त भाव १०० रुपये आहे तो शेअर जर ४०० रुपयांना मिळत असेल तर तो बराच फुगलेला आहे हे स्पष्ट होते. बऱ्याच चांगल्या कंपन्यांचे शेअर रास्त भावापेक्षा जास्त किमतीवरच ट्रेड होत असतात म्हणजेच अशा शेअरची आजची  किंमत ही भविष्यातील महत्व आणि परतावा दाखवून मिळवण्याचा ट्रेडर्स चा प्रयत्न असतो. कधी काही कारणांनी बाजार खाली गेला कि हेच शेअर थोड्या कमी किमतीत उपलब्ध होण्याची संधी मिळू शकते. आता जर गुंतवणुकीचा अवधी न ठरवता अशा शेअर मध्ये जवळचे सगळे पैसे गुंतवले तर गरज भासल्यास तोटा सहन करून गुंतवणूकदाराला ह्या शेअरमधून बाहेर पडावे लागेल ह्याची शक्यता जास्त असते. ह्यावर उपाय साधाच आहे ; कितीही मोह झाला तरीही पूर्ण रक्कम आणि ती पण एकदाच एका शेअरमध्ये गुंतवणे टाळावे. 



३) बाहेर पडण्याची योजना नसणे. 
इथे गुंतवणूकदाराची खरी कसोटी असते. कारण त्याने घेतलेल्या शेअरची किंमत वाढली कि तो विकून मोकळा व्हावे हे कुणालाही न पटण्यासारखे आहे. इथे Greed आणि Fear मधील Greed आडवी येते. कोणताही शेअर एकदम सरळ वरच्या दिशेने क्वचितच जातो; मध्ये मध्ये तो दोन्ही दिशेने प्रवास करतो. तिनमाही निकालावरून एखाद्या कंपनीचा फायदा वाढत आहे किंवा कमी होत आहे हे बघून अशा शेअर मध्ये प्रवेश किंवा त्यातून बाहेर पडत येते. जर कंपनीचा फायदा वाढला असेल तर बरेच नवीन लोक हे शेअर घेऊ इच्छितात म्हणजेच नजीकच्या काळात शेअरची किंमत वाढण्याची शक्यता  असते. कधी कधी सरकारच्या बदलत्या धोरणानुसार सुद्धा कंपन्यांचे आगामी फायदे नुकसान काही अंशी ओळखता येतात. आता फायदा किती झाला तर विकावा हा प्रश्न स्वतःने स्वतःला विचारणे ठीक राहील, कारण इथे प्रत्येकाचे आपापले मत असू शकते. आत जाते वेळी बाहेर पडण्याची योजना असणे हा चढत्या बाजारात फायदा करून घेण्याचा (आणि पडत्या बाजारात आपली बचत वाचवण्याचा) एक चांगला उपाय आहे.   


४)चुकीच्या वेळी शेअर विकत घेणे.
Time  Is  Money ही म्हण इथे अगदी मस्त बसते.  तशी ही चुकी वरच्या चुकांमधील सुद्धा एक भाग आहे. पण ही चूक स्वतःसुद्धा एक स्वतंत्र्य भूमिका (अर्थातच गुंतवणूकदाराच्या नुकसानीसाठी) निभावते. वेळ योग्य कि अयोग्य हे समजून घ्यायला थोड्या विस्ताराने कधी लिहावे लागेल. इथे (काही अंशी ) तार्किक विश्लेषण मदत करते. नेहमी आपले विश्लेषण आपल्याला संधी देईलच असे पण नाही; कारण बाजारातील शेअरची दिशा ही अनेक कारणांमुळे ठरत असते. पण तरीही योग्य वेळ साधता येणे बहुतांश वेळी शक्य आहे. तार्किक विश्लेषणात double top , double  bottom आणि असेच अजून काही चार्ट पॅटर्न बघून अनेक गुंतवणूकदार एखादा शेअर कधी विकावा आणि कधी घ्यावा हे ठरवू शकतात. एकदम अचूक हे घडलंच असे नसते. पण बऱ्याच संदर्भात असे चार्ट बघून एखादा शेअर कधी घेतला तर फायदा होईल हे ठरवता येते. जास्तच सावध रणनीती असेल तर जितके शेअर घ्यायचे असतील ते ३-४ वेळेच्या टप्प्यात विभागून घेऊन विकत घेणे हा एक पर्याय काही जण निवडतात. 

५) एकंदरीत गुंतवणुकीत सुसूत्रता नसणे. 
ह्या गोष्टीला चुकी  म्हणता येईल का असा प्रश्न कुणाला पडणे स्वाभाविक आहे. पण ह्या चुकीचा मोठा प्रभाव एखाद्याच्या गुंतवणूक योजनेवर पडणे क्रमप्राप्त आहे.  ह्यामध्ये Asset Allocation ला ध्यानात न घेता शेअर मध्ये पैसे गुंतवणे ही बाब येते. वर सांगितल्याप्रमाणे फक्त शेअर आणि शेअर मध्ये रक्कम गुंतवणे  आणि बाजार वर कधी जातो आणि परतावा कधी मिळतो ह्याकडे लक्ष ठेवणे एवढे करण्यातच एखाद्याची शक्ती खर्ची पडते. ह्याला टाळण्यासाठी अनुभवी अशा सल्लागाराकडून पूर्ण योजनेवर काम करून मगच तुम्हाला योग्य असलेले गुंतवणूक प्रमाण ठरवावे आणि त्याप्रमाणे गुंतवणुकीचा प्रवास करावा.जवळच्या लक्ष्यासाठी जमा केलेले पैसे शेअर मध्ये गुंतवण्याचा सल्ला अनुभवी सल्लागार देणार नाही.


टीप: गुंतवणूक विश्वातील अनेक चुकांपैकी ह्या काही सहज आढळणाऱ्या चुका  आहेत आणि ह्यावरील उपाय हे माझे वैयक्तिक मत आहे. वाचकांनी आपापला विवेक वापरून निर्णय घ्यावा.



हा ब्लॉग सध्या https://paisamantra.in/ ह्या संकेतस्थळावर हलवण्यात आलेला आहे नवीन लेख वाचण्यासाठी कृपया https://paisamantra.in/ इथे क्लिक करा 

४ टिप्पण्या:

Please do not enter any spam link in the comment box.